दिवाळी संच

Diwali Sancha will be shipped on 15th October 2025.

१८०० रुपयांचा मॅजेस्टिकचा दर्जेदार दिवाळी संच फक्त १४०० रुपयांत. यात समावेश आहे ५ दर्जेदार दिवाळी अंकाचा. दीपावली, महाराष्ट्र टाइम्स, ऋतुरंग, अनुभव, अक्षर,. याशिवाय... 'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस' ने नवीन प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांपैकी आपणांस आवडलेले कोणतेही एक पुस्तक नोंदणी करून संचाबरोबर मिळवा. हा देखणा संच आपणासाठी खरेदी करा आणि दिवाळीनिमित्त आपल्या आप्तस्वकीयांनाही भेट द्या. खालील चार पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडा

Please select any one book with this Diwali Sanch

पुस्तकाचे नाव - महानगर (कादंबरी)
लेखकाचे नाव - मिलिंद बोकील
मूल्य :- २५०/-
'महानगर' ह्या संग्रहातील कथा आहेत शहरी-औद्योगिक पार्श्वभूमी असलेल्या. मानवी जीवनाचा भाग बनलेली यंत्रे इथे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मानवी भावनांचं जग संस्कारित करतात. मग ते शस्त्रक्रियेत मदत करणारं जीवनदायी यंत्र असो वा स्मशानातील विद्युतदाहिनी; मोटारींचं इंजिन असो की लैंगिकतेचा बाजारू कल्लोळ टिपणारा निर्विकार कॅमेरा. महानगरी जीवनव्यवस्थेतून काही प्रश्न निर्माण होतात. माणसं यंत्रांशी खेळतात की यंत्र माणताना खेळवतात ? यंत्राप्रमाणे माणसांनाही गृहीत धरलं जातं का? शहरी व्यवस्थेत माणूसपणा वाढतो की कमी होतो? मिलिंद बोकील यांच्या या कथांमध्ये मनातील अंतर्द्धद्ध हे अंघार-प्रकाश, दिवस-रात्र, यांत्रिक-भावनिक अशा द्वैती ताणातून व्यक्त होतं. हा ताण शोघणं हे या कथांचं सूत्र. प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन ह्यांची चित्रे ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाला लाभलेली आहेत. माणूस, कुटुंब आणि प्रवास ही त्रिसूत्री पटवर्धनांच्या चित्रांमधूनही व्यक्त होते. मुखपृष्ठावरील चित्रातून दिसणारी रेल्वे ब्रिजवरील अस्वस्थ लगबग आणि मलपृष्ठावर व्यक्त होणारी नागरी विषमता ह्या प्रतिमा संवाद साधतात बोकीलांच्या अव्यक्त आशयाशी!

पुस्तकाचे नाव - व्यक्ती आणि वाङ्मय (ललितलेखन)
लेखकाचे नाव - गोविंद तळवलकर
मूल्य :- २५०/-
आचार्य जावडेकर, म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या राजकारण-समाजकारणातल्या व्यक्ती यांच्या जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी, त्यांचे आणि त्यांच्यावरील महत्त्वाचे ग्रंथ, यांविषयीच्या लेखांचा समावेश या पुस्तकात आहे. ऑर्वेल व कोस्लर, ग्रॅहम ग्रीन अगदी संत तुकाराम व रामदास यांच्या साहित्याचा निमित्ता-निमित्ताने घेतलेला परामर्श, कवी कुसुमाग्रज यांना मिळालेले ज्ञानपीठ, प्रकाशक हरीभाऊ मोटे, अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख, जे. आर. डी. टाटांमधल्या कवीची ओळख करून देणारा लेख, पत्रकार अनंतराव भालेराव इ. इ. वरील या पुस्तकातील लेख हे त्यांच्या लेखनाबरोबर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उचित परिचय करून देतात. या पुस्तकाच्या निमित्ताने वाचक देश-परदेशातील साहित्य, राजकारण, समाजकारण यांच्याशी परिचित होतो आणि समृद्ध होतो.

पुस्तकाचे नाव - जंटलमन चोर (कथासंग्रह)
लेखकाचे नाव - दामोदर मावजो
मूल्य :- २५०/-
दामोदर मावजो यांच्या 'जंटलमन चोर' या संग्रहातल्या कथांचा सामाजिक आणि प्रादेशिक पैस विस्तीर्ण आहे. गोव्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक घडणीमुळे की काय, कोंकणी भाषेत लेखन करणाऱ्या दामोदर मावजो यांच्या लेखनाचा पोतही बहुपदरी झाला आहे. लेखक म्हणून त्यांच्या सहानुभूतीचा पैसही विस्तारला आहे. या कथांमधली माणसं गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, बंगाल, अमेरिका अशा विविध प्रदेशांमध्ये वावरतात. रस्त्यावर राहणाऱ्या, गरीब मजुरापासून कॉर्पोरेट अधिकारी, डॉक्टर, बिल्डर असे व्यवसाय करणाऱ्यांच्या भौतिक जीवनाचा आणि आंतरिक विश्वाचा वेध मावजो या कथांमधून घेतात. या कथांना सध्याच्या आपल्या समाजातल्या पुरुषवादी, धर्मवादी, सांस्कृतिक अस्मितावादी धारणा आणि त्यामुळे जीवनात निर्माण होणारे पेच यांचे संदर्भ आहेत. कथानकाच्या पातळीवर हे संदर्भ पात्रांच्या जीवनातल्या घटना-प्रसंगांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसतात. या कथांमध्ये नाट्यमय आणि योगायोगप्रधान प्रसंगरचना प्राधान्याने दिसत असल्या, तरी असे प्रसंग पात्रांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या अनुभवांच्या रूपाने येत असल्यामुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतात आणि त्या पात्रांशी वाचकाचा सहानुभाव प्रस्थापित होतो. एका प्रगाढ मानवतावादी लेखकाच्या सहवासात आपण आहोत, अशी या कथा वाचताना वाचकाची भावना होते. - नीतीन रिंढे

पुस्तकाचे नाव - दशकातले लेखक (मुलाखती)
लेखकाचे नाव - स्नेहा अवसरीकर
मूल्य :- ३००/-
लेखक काळाबरोबर जगत अत्यंत संवेदनशीलतेने लेखनातून काळ नोंदवत राहतो. आपल्या जगण्याच्या, जगण्याभोवती नांदणाऱ्या समाजाच्या, समाजातल्या भल्याबुऱ्या गोष्टींच्या नोंदी घेत लेखन करत राहतो. २०१० ते २०२० या दशकात लिहिणाऱ्या लेखकांनी नेमके कोणते विषय कोणत्या समाजप्रश्नांची दखल घेतली आहे ? कथा-कादंबरीसारख्या सर्जनात्मक साहित्यप्रकाराचा विचार या दशकातल्या लेखकांनी कसा केला आहे ? निर्मितिप्रक्रियेतील गुंतागुंत त्यांना सांगता येईल का ? ज्या काळात ते वावरत आहेत त्याकडे ते कसं बघत आहेत ? मुलाखतींतून यांसारख्या विचारलेल्या प्रश्नांतून २०१० - २०२० या दशकात महत्त्वपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांची सर्जनशीलता आणि जडणघडण उलगडत गेली. एका दृष्टीने हा २०१० - २०२० या दशकातल्या लिहित्या लेखकांचा लेखाजोखा ठरू शकतो... - स्नेहा अवसरीकर

Buy Now
×
My Cart